सातारा / नागठाणे : अवैधरीत्या गांजाविक्रीसाठी नेत असताना बोरगाव पोलिसांनी सापळा रचून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी अपशिंगे (मि.) हद्दीत बोरगाव पोलिसांनी केली. संशयितांकडून १६,५०० रुपये किमतीच्या चार किलो गांजासह एक दुचाकी व मोबाईल्स असा सुमारे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी बाळू हणमंत चव्हाण (वय ४३, रा. सातारा रोड, ता. कोरेगाव), नाना महादेव मसगुडे (५०, रा. अपशिंगे (मि.), ता. सातारा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अपशिंगे (मिल्ट्री) गावाच्या हद्दीतून दोघेजण चोरून गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना गुरुवारी (दि. ७) मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी अपशिंगे (मि.) ते देशमुखनगर जाणाऱ्या रस्त्यालगत वाघजाई मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी एका दुचाकीवरून दोन व्यक्ती तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना या दोघांजवळ एक प्लास्टिकचे पोते आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्या पोत्यात गांजा असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे बाळू हणमंत चव्हाण व नाना महादेव मसुगडे असल्याचे सांगून हा गांजा सातारा येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार किलो वजनाचा गांजा, एक दुचाकी व तीन मोबाईल्स असा ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत या दोघांना रात्री उशिरा अटक केली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, स्वप्निल माने, विजय साळुंखे, राहुल भोये, विशाल जाधव, सातारा येथील अप्पर तहसीलदार सोपान टोपे यांनी कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ तपास करीत आहेत.