सातारा : शहरातील पोवइ नाका या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री आग लागून एक दुचाकी खाक झाली तर एका कारसह अन्य एका दुचाकीला आगीची झळ पोहोचली. यामुळे तिन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्हीमुळे या आगीच कारण उलघडलं. एका दुचाकीला अचानक शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले.याबाबत अधिक माहिती अशी, पोवइ नाक्यावर रस्त्याच्याकडेला रात्रीच्या सुमारास अनेक वाहने पार्क केली जातात. यातील एका दुचाकीला शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास आग लागली. आगीचे लोट पसरल्यानंतर काही लोकांना जाग आली. रस्त्यावर येऊन लोकांनी पाहिले असता एक दुचाकी पूर्णपणे खाक झाली होती. तर जळालेल्या दुचाकीच्या शेजारी उभ्या असलेली एक कार आणि दुचाकीलाही आगीची झळ बसली.
कारची पुढील बाजू थोडी जळाली तर दुसऱ्या दुचाकीचीही पुढील बाजूच जळाली. यात तिन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही आग लावली की लागली, याबाबत शहरात सकाळी चर्चा सुरू झाली.
पोलिसांनी तातडीने घटनासथळी धाव घेऊन पंचनामा करण्यास सुरूवात केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथील एका दुचानासमोरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावेळी या आगीचे कारण स्पष्ट झाले.
ही आग सुरूवातीला एका दुचाकीला शॉर्टसर्किटमुळे लागली. त्यानंतर शेजारील कार आणि दुसऱ्या दुचाकीलाही आगीची झळ बसल्याचे समोर आले. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.