फलटण : जाधववाडी (ता. फलटण) येथे मेडिकलमध्ये गोळ्या आणण्याकरिता पायी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, जखमींवर उपचार सुरू असताना एक जणाचा पुणे येथे मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व फलटण शहर पोलीस स्टेशनमधून दिलेली माहिती अशी की, मुकुंद हनुमंत जाधव (वय ४१ रा. जाधववाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ ता. फलटण, जि. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ मार्च रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी ता. फलटण गावचे हद्दीत निरगुडी-फलटण रोडवर साई मंदिर समोरील रोडवर नरेंद्र सतीश जाधव व नीलेश मोहन जाधव हे साई मंदिर येथे मेडिकलमध्ये गोळ्या आणण्याकरिता पायी जात असताना नरेंद्र सतीश जाधव यांना पाठीमागून निरगुडी बाजूकडून फलटण बाजूकडे आलेल्या दुचकीने चालक सचिन आडके (रा. मठाचीवाडी ता. फलटण, जि. सातारा) याने दुचाकी भरधाव वेगात चालवून नरेंद्र जाधव यास पाठीमागून धडक देऊन अपघात केला. अपघातात नरेंद्र जाधव याला गंभीर जखमी करून दुचाकीवर पाठीमागे बसलेले सुरज तानाजी भोईटे (रा. राजाळे) यांना जखमी करून उपचारास दवाखान्यात न नेता अपघाताची खबर पोलीस स्टेशनला न देता पळून निघून गेला आहे.
नरेंद्र सतीश जाधव (रा. जाधववाडी ता. फलटण), सुरज धनाजी भोईटे (रा. राजाळे ता. फलटण) हे अपघातात गंभीर जखमी झाले असता त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी नरेंद्र सतीश जाधव यांचा पुणे येथे ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे.