शिरवळ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील ‘एस’ वळणावर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच रात्री आठच्या सुमारास एक दुचाकी घसरली. त्यानंतर दुचाकीवरील तरुण-तरुणी मालट्रक खाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेशोत्सव अन् त्याला जोडूनच शनिवार, रविवार सुट्या जोडून आल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळपासून वाहतुकीची कोंडी झाली आहे. या परिसरात तब्बल सोळा तासांपासून वाहने ठप्प आहेत. कित्येक वेळ गाड्या जागेवर सुरू असल्याने गरम होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बॉनेट उघडून वाहने उभी आहेत.दरम्यान, दुचाकी (एमएच १४ केव्ही ३८८४) वरून २४ वर्षीय तरुण अन् २२ वर्षीय तरुणी साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघाले होते. खंबाटकी घाटातील एस वळणावर ते दोघे आले असता त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे ते दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येत असलेल्या मालट्रक (केए ६७ ९९९८)च्या खाली ते आले. त्यांच्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलिस निरीक्षक श्रीसुंदर वंदना, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजीव आहेरराव तसेच भुईंज महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली.
दिवसभरात पाच अपघातखंडाळा तालुक्यात महामार्गावर रविवारी दिवसभरात पाच विविध अपघात झाले. यामध्ये ‘एस’ वळणावर दुपारी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. रात्री दुचाकी घसरल्याने अपघात झाला. एका हॉटेलसमोर ट्रकने पादचाऱ्याला उडविले, तर धनगरवाडी हद्दीत दुचाकीचा अपघात झाला. या सर्व अपघातांत दोन ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत.