पुसेगाव : पुसेगाव-फलटण मार्गावर येथील ओढ्यावर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलालगत खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडल्याने खातगुण येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. ८ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. यामुळे परिसरातील युवक संतप्त झाले असून त्यांनी पुलाचे काम बंद पाडले. बळीराम शिवराम यादव ( वय ३७ ) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, संंबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे.
पुसेगाव-फलटण मार्गाचे काम सध्या सुरू असून त्याअंतर्गत येथील ओढ्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. या नवीन पुलालगत खोदण्यात आलेल्या खोल खड्ड्यात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास खातगुण येथील बळीराम यादव हा मोटारसायकलस्वार पडला. यामुळे त्याला जीव गमवावा लागला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
पुसेगाव-फलटण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. काम सुरू झाल्यापासून येथे लहान-सहान अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तरीही या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बेजबाबदार असलेल्या ठेकेदारावर खातगुण येथील व्यक्तीच्या मृत्यूबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे सुरज जाधव, सकल मराठा मोर्चाचे दीपक तोडकर, आकाश जाधव, अमित जाधव, दत्ता जाधव उपस्थित होते.
०९पुसेगाव-अॅक्सीडेंट
पुसेगाव येथील लेंढोरी ओढ्यावर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. यासाठी खोदलेल्या या खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. (छाया : केशव जाधव)