संजय पाटील, कऱ्हाड: ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कऱ्हाड-तासगाव मार्गावर कार्वेचौकी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला.
अरविंद मधुसूदन चिपाडे (वय, ६४. रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा, जि.सांगली) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले मच्छिंद्रगड येथील अरविंद चिपाडे हे पत्नी स्नेहल यांच्यासह बुधवारी दुपारी कऱ्हाडला आले होते. ते कऱ्हाडमधील काम आटोपून गावी किल्ले मच्छिंद्रगडला दुचाकीवरून निघाले होते. कऱ्हाड-तासगाव मार्गावरून जात असताना ते कार्वे चौकीपासुन काही अंतरावर रस्त्याकडेला थांबले.
याचवेळी कार्वे गावाकडून कृष्णा कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर वेगाने निघाला होता. काही कळण्याच्या आतच भरधाव ट्रॅक्टरने अरविंद चिपाडे यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने चिपाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
किल्ले मच्छिंद्रगड येथील अरविंद चिपाडे हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वाहतूक विभागातून पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. आरटीओ एजंट म्हणून सांगली व इस्लामपूर येथे त्यांनी काम केले होते.