सातारा : बहुचर्चीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज, गुरुवारी सकाळी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली.जरांगे-पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली असून, संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलन उभे राहू लागले आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येऊ लागली असून, तसे फ्लेक्स झळकू लागले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनीदेखील आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल, बुधवापासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.आज, गुरुवारी सकाळी मराठा समाजाच्यावतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगरपालिका, राजपथ, मोतीचौक, गोलबाग मार्गे पाचशे एक पाटी, पोलिस मुख्यालय, पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. त्यानंतर मराठा समाज बांधव साखळी उपोषणात सहभागी झाले.यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, हर हर महादेव, बघताय काय सामील व्हा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आरक्षणाचा मुद्दा पेटला.. मराठा पुन्हा एकवटला!; जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात दुचाकी रॅली
By सचिन काकडे | Published: October 26, 2023 1:23 PM