सातारा : चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्याला पोलिसांनी शिताफीने पकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. जुबेर शबाब शेख (वय १९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे संशयिताचे नाव असून, त्याच्यावर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी, एटीएम, मोटारसायकल, चारचाकी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
याबाबत माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील एक गुन्हेगार चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी शाहूपुरी चौकाजवळील रॅम्पजवळ येणार आहे, अशी खबर मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या परिसरात सापळा लावून थांबले. बुधवारी (दि. २८) रात्री ७.५० च्या सुमारास रेकॉर्डवरील संशयित काळे रंगाची विनानंबरप्लेटची मोटारसायकल घेऊन विक्रीसाठी येताच दबा धरून बसलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी जुबेर शेख याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने मित्रासह दोन दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरी करून विक्रीसाठी आल्याची कबुली दिली. या मोटारसायकलीबाबत अधिक माहिती घेतली असता त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद आहे.
ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव यांनी केली.