सातारा : तालुक्यातील वडूथ येथे असणाऱ्या कालवा परिसरात एका दुचाकीस्वाराने सायकलवरुन निघालेल्या मजुराला दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौलत जंगली साहब (वय ६५, रा. वडूथ, ता. सातारा) हे मजुरी करतात. मंगळवार, ९ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या सायकलवरुन निघाले होते. वडूथ गावच्या हद्दीत असणाऱ्या कालव्याजवळ ते आले असता, समोरुन अनिल महादेव साबळे (रा. वडूथ) हे दुचाकीवरुन आले. यावेळी दौलत यांची सायकल आणि अनिल याच्या दुचाकीची घासाघीस झाली. यावेळी दौलत यांनी ‘दुचाकी व्यवस्थित चालवता येत नाही का..?,’ असे विचारताच संतापलेल्या अनिल याने दौलत यांना शिवीगाळ करत दमदाटी केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर दौलत यांनी याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अनिलवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.