वाठार स्टेशन : सोळशी-वाठार रस्त्यावर नांदवळनजीक (ता. कोरेगाव) झालेल्या दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोनजण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी दोन वाजता झाला.समीर राजेंद्र कांबळे (वय १९, रा. सोळशी, ता. कोरेगाव), सुशील जनार्दन डेरे (४०, रा. सर्कलवाडी, ता. कोरेगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीरची चुलती नंदा वसंत कांबळे व चुलत भाऊ सुशील वसंत कांबळे हे पिंपोडे येथील खासगी दवाखान्यात अॅडमिट होते. त्यांना दुपारी घरी सोडण्यात येणार होते. दवाखान्याचे बिल भरण्यासाठी पाचशे रुपये कमी पडत असल्याने समीर पैसे घेऊन पिंपोड्याकडे दुचाकीवरून निघाला होता. त्याचवेळी इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करणारे सुशील डेरे हे त्यांच्या दुचाकीवरून सोळशीकडे निघाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नांदवळ गावच्या हद्दीत थड्याच्या चौकापासून पुढे दोनशे मीटर अंतरावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही उंच उडून बाजूला फेकले गेले. त्यात समीर व सुशील यांच्या कपाळाला गंभीर जखम झाली. दोघेही रक्तबंबाळ झाले. त्यांना पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच दोघेही मृत्युमुखी पडले होते. समीर एकुलता एक होता, त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याचे वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने तो कॉलेजमध्ये शिकत सुटीत कामाला जात होता. तर सुशील यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली व वडील असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त समजल्यावर दोघांच्याही नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केला. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजता मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)तीव्र उतार जीवघेणा प्रवास!या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. तीव्र उतारावर असलेल्या वळणामुळे व चौकामुळे वेगात येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अपघात झाला होता. त्यामध्ये एकजण जागीच ठार झाला होता. वारंवार जीवघेणे अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
नांदवळ येथे दुचाकींची धडक; दोन जागीच ठार
By admin | Published: April 26, 2017 11:29 PM