सातारा : तालुक्यातील अतित येथे तारेचे कंपौंड घालण्याच्या कारणावरून चौघांनी दोन महिलांना कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सुरज जाधव, धनाजी सावेकर, अभिषेक ऊर्फ श्रीहरी सावेकर आणि पवन सावेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, शोभा गुलाब कारंडे (वय ५४, रा. अतित, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुरज राजेंद्र जाधव हा अतित गावच्या हद्दीत घरचामाळ नावाच्या शिवारात असणाऱ्या त्याच्या पाच गुंठे क्षेत्रांत कामगारांच्या मदतीने तारेचे कम्पाऊंड घालत होता. यावेळी शोभा यांनी त्यांना तुम्ही तुमची जागा निश्चित करा आणि मग कंपौंड घाला, असे सांगितले. याचा राग आल्यामुळे सुरज तसेच धनाजी बाबूराव सावेकर, अभिषेक ऊर्फ श्रीहरी धनाजी सावेकर, पवन धनाजी सावेकर (सर्व रा. अतित, ता. सातारा) या चौघांनी शोभा आणि साक्षीदार गीता गणेश कारंडे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी सुरज याने शोभा आणि गीता या दोघींना कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. यात त्या दोघीही जखमी झाल्या. दरम्यान, याप्रकरणी दि. २६ रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार एन. व्ही. महाडिक हे अधिक तपास करत आहेत.