भुर्इंज : आनेवाडी टोलनाक्यावर काम करत असणाऱ्या ८० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यानंतर गेली दोन वर्षे त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमच त्यांना देण्यात आली नाही. याबाबत वारंवार हेलपाटे घालून वैतागलेले हे कर्मचारी आता पुरते हवालदिल झाले असून, सर्वांचा मिळून असणारा लाखो रुपयांचा निधी दसऱ्यापर्यंत न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना किरण जाधव म्हणाले, ‘टोलनाक्यावर काम करणाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांना काम करतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि आता राजीनामा घेतल्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. काम करत असताना पगाराच्या पावत्या न देणे, मन मानेल त्या पद्धतीने कामगारांना वागणूक देणे, विनाकारण पगार कपात करणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, घरापासून जवळ काम आहे म्हणून अनेकांनी त्याही परिस्थितीत काम केले. अनेकांना प्रदूषणाचा गंभीर त्रास सहन करावा लागला. टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलले की कायदा बदलतो त्याचाही फटका कामगारांना प्रत्येकवेळी बसत आला आहे. या सर्व कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम लाखो रुपये असून, यातील ९५ टक्के कामगार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आनेवाडी टोलनाक्यावर काम केलेल्या कामगारांवर हा प्रचंड मोठा अन्याय होत आहे. गेली अनेक महिने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे हे संबंधित सर्वच कर्मचारी एकत्रितपणे याबाबत लवकरच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे तक्रार करणार आहेत. कारण आता त्यांच्याकडूनच आम्हाला खऱ्या अर्थाने न्यायाची अपेक्षा करावी लागेल, असेही जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)८० जणांवर संक्रांत : कामगार झालेत हताशअनेक कामगारांना कोणतेही कारण न देता घरी घालवण्यात आले आहे. त्यामुळे वैतागून अनेकांनी भविष्य निर्वाह निधी मिळेल म्हणून राजीनामा दिला आहे. मात्र, ८० हून अधिक कामगारांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. ठराविक जणांना ठराविक कारणाची पूर्तता केल्यानंतर ही रक्कम दिली असून, काम नसल्यामुळे बेकार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे कोणत्याही अपेक्षेविना दिले पाहिजेत.
दोन वर्षांपासून लाखोंचा भविष्यनिर्वाह निधी रखडला
By admin | Published: September 22, 2016 11:33 PM