प्रमोद सुकरे -कऱ्हाड --विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणेतून एकमेकांशी दोन ‘हात’ करणारे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व युवक नेते डॉ. अतुल भोसले हातात हात घालण्याची शक्यता आहे. होऊ घातलेल्या जिल्हा बँक व ‘कृष्णा’ कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू आहेत. राजकारणात कोण-कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. त्याला कऱ्हाडचं राजकारणही अपवाद नाही. गेली अनेक पंचवार्षिक निवडणुकीत विधानसभेला विलासराव पाटील-उंडाळकरांना भोसले गटाने मदत केल्याचे उघड आहे; पण भोसले यांच्यात डॉ. अतुल भोसलेंच्या रूपाने युवा नेतृत्व उभारी घेऊ लागलं अन् दोन गटात नकळत धुसफूस सुरू झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणेत तिरंगी लढत झाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व युवा नेते डॉ. अतुल भोसलेसुद्धा रणांगणात उतरले. आरोप-प्रत्यारोपांच्या तिहेरी फैरीही झडल्या. निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांनी बाजी मारली. अशातच विधानसभा निवडणुकीला काही महिने उलटले असतानाच ‘सह्याद्री’चा बिगुल वाजला. त्याचा गुलाल खाली बसतो न बसतो तोच आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ‘बिगुल’ वाजलाय. तर ‘कृष्णा’ साखर कारखान्याचीही रणधुमाळी सुरू झालीय. त्यामुळे नव्या निवडणुकांसाठी आता नवी राजकीय समीकरणे जुळू पाहत आहेत. माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकरांना यंदाही जिल्हा बँकेची निवडणूक लढायची आहे. ते नेहमीप्रमाणे विकास सेवा सोसायटीमधूनच लढणार हे निश्चित. कऱ्हाड तालुक्यातून सोसायट्यांचे १४० ठराव गेले आहेत. त्यात माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. अतुल भोसले यांच्यासह माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते समर्थकांचा सहभाग आहे.नुकत्याच झालेल्या सह्याद्रीच्या निवडणुकीकडे पहाता उंडाळकरांना जिल्हा बँकेत उत्तरचे आमदार मदत करणार नाहीत, हे निश्चित. पृथ्वीराज चव्हाण गट तर मदत करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे उंडाळकरांनी पुन्हा एकदा भोसले गटाशी जुळवून घेण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्याबदल्यात नजीकच्या काळात होऊ घातलेल्या ‘कृष्णा’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर आपली ताकद भोसलेंच्या पाठिशी उभे करतील, अशी चर्चा आहे. पण विधानसभेचं काय ?उंडाळकर - भोसले गटाने जर पुन्हा हातात हात घातला तर बऱ्याच कार्यकर्त्यांना समाधान होईल. स्थानिक पातळीवरील राजकारण कार्यकर्त्यांना सोयीचं होईल; पण पुन्हा पाच वर्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं काय? अशीही चर्चा काही कार्यकर्त्यांमध्ये आहे.विरोधी उमेदवार अनिश्चित ?जिल्हा बँक निवडणूकीसाठी एकीकडे उंडाळकरांचा गनिमी कावा सुरू असताना विरोधी उमेदवार मात्र सध्या अनिश्चितच आहेत. उंडाळकरांच्या विरोधात जिल्हा बँकेत कोण शड्डू ठोकणार, याबाबत कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता आहे.
उंडाळकर-भोसले म्हणे ‘हम साथ साथ है’
By admin | Published: March 31, 2015 10:22 PM