आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २२ : खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून गायब असलेले खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक साताऱ्यात आले. सुमारे पाच तास त्यांनी शहरात थांबून सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले.सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गेल्या तीन महिन्यांपासून उदयनराजे साताऱ्यातही फिरकले नाहीत. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांनी अचानक साताऱ्यात येऊन कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला.
महामार्गावरून उदयनराजे शहरात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. जलमंदिरवर गेल्यानंतर मातोश्री कल्पनाराजे भोसले यांची त्यांनी केवळ दहा मिनिटे भेट घेतली. त्यानंतर रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान सातारा विकास आघाडीच्या प्रत्येक नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा होता. रात्री साडेबाराच्या सुमारास ते पुण्याकडे निघून गेले.