सातारा / मेढा : खर्शी बारामुरे (ता. जावळी) येथे झालेल्या राजकीय धुमश्चक्रीचे पर्यवसान दरोड्याच्या गुन्ह्यात झाले असून, खासदार उदयनराजे भोसले आणि वसंत मानकुमरे यांच्यासह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, दुसरीकडे पोलिसांनी मानकुमरे व त्यांच्या चिरंजीवाला पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना आज (गुरुवार) पासून दोन दिवस जावळी तालुक्यात प्रवेश बंदीचा आदेश प्रशासनाने बजावला आहे.जावळी ‘बंद’चे बुधवारी आवाहन केल्यानंतर मेढ्यामध्ये कडकडीत, तर इतर ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मेढा मुख्य बाजारपेठेमध्ये सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. मात्र, इतर व्यवहार सुरळीत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चारशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा जावळी तालुक्यात तैनात केला होता. साताऱ्याहून खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक मेढा येथे येणार असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी मोळाचा ओढा येथे तत्काळ तपासणी केंद्र उभारले. वाहनांमध्ये बसलेल्या व्यक्तींची ओळख पटल्यानंतरच पोलिस संबंधित वाहनाला पुढे जाऊ देत होते. (प्रतिनिधी)उदयनराजे गटाने म्हणे मंगळसूत्र हिसकावले !खासदार उदयनराजे यांचे समर्थक अजिंक्य मोहिते याने पत्नीच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार वसंत मानकुमरे यांनी दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी उदयनराजेंसह अजिंक्य मोहिते, गणेश जाधव, किशोर शिंदे, लखन कोटक, अशोक सावंत, संग्राम बर्गे, जितेंद्र राठोड, योगेश गोळे, सयाजी शिंदे यांच्यासह ३५ ते ४० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.मानकुमरेंच्या पत्नीने म्हणे थोबाडीत मारली !अजिंक्य मोहिते याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वसंत मानकुमरेंसह ३५ ते ४० जणांनी हल्ला करून गाडीची तोडफोड, तसेच गळ्यातील पाच तोळ्याची चेन आणि २० हजारांची रोकड हिसकावून नेली, तर स्वप्निल मानकुमरे याने गळ्याला गुप्ती लावली. तसेच जयश्री मानकुमरे यांनी थोबाडीत मारली. या तक्रारीवरून पोलिसांनी वसंत मानकुमरे, स्वप्निल मानकुमरे, जयश्री मानकुमरे, विक्रम शिंदेसह ३५ ते ४० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.पिता-पुत्राच्या विरोधात पोलिसांकडूनच गुन्हा खर्शी बारामुरे (ता. जावळी) येथील मतदान केंद्रावर पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न, तसेच पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत मानकुमरे तसेच त्यांचा मुलगा स्वप्निल मानकुमरे यांच्यासह अन्य एकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.खर्शी बारामुरे मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मानकुमरे समर्थकांनी दगडफेक केली होती. यामध्ये पोलिसांच्या गाडीचेही नुकसान होऊन दोन पोलिसही जखमी झाले होते. ३०७, ३५३ या कलमांन्वये पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय वाहनाचे नुकसान करणे या कलमांखाली मानकुमरेंसह त्यांचा मुलगा स्वप्निल आणि इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला होता. बुधवारी दिवसभर वसंत मानकुमरे हे पोलिस बंदोबस्तात होते. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपावरून दोघांनाही अटक केली. अटकेची माहिती समजताच तालुक्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
उदयनराजेंसह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल!
By admin | Published: February 22, 2017 10:49 PM