सातारा : लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी अर्जादरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीवेळी दागिने चोरणाºया दोघा संशितांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांकडून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
भाऊसाहेब महादेव काळे, समाधान बाबुराव खिंडकर (दोघे रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्ह्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गांधी मैदानात जमले होते. उदयनराजेंची राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली होती. या रॅलीत जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी अनेकांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चेन व खिशातील रोकड चोरून हात साफ केले. गर्दीमध्ये चेन व पॉकेट खाली पडले असावे, म्हणून कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, अनेकजण अशाप्रकारे शोधाशोध करत असल्याचे पाहून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनेकांनी रॅली अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. त्यामध्ये अजय यशवंत भोसले (वय ४०,रा. राधिका रोड, भोसले मळा सातारा) यांचाही समावेश होता.
शेटे चौकामधून पोवई नाक्याकडे जात असताना त्यांच्याजवळील पिशवी चोरट्यांनी हातोहात लांबविली होती. त्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने, १३ हजारांची रोकड असा सुमारे १ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकारामुळे पोलीस खडबडून जागे झाले. रॅली संपण्यापूर्वीच पोलिसांनी सापळा लावला. त्यामध्ये बीडचे दोघे संशयित म्हणून पोलिसांना सापडले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर भाऊसाहेब काळे याच्या नावावर बीडमध्ये चोरीचे ३ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. परंतु साताºयात चोरी केलेला ऐवज त्यांच्याजवळ सापडला नाही. या दोघांसोबत आणखी दहा ते बाराजण असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. ऐवज चोरल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे दिला असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सातारा पोलीस तपासाच्या अनुषंगाने गुरूवारी बीडला जाण्याची शक्यता आहे.