सातारा - उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या भाजपाप्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय वर्तुळातून तसेच समाजमाध्यमातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहे. मात्र यादरम्यान, उदयनराजेंचे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. शिवेंद्रसिंहराजे यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असेल्या सातारा राजघराण्यातील या दोन सदस्यांच्या आजच्या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविले. नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या विचारांशी सहमत असल्यामुळे भाजपा प्रवेश केला आहे. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. निस्वार्थ भावेनेतून लोकांच्या हितासाठी भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी उदयनराजे भोसले यांनी सांगितले.तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते.
भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:52 PM