सातारा : सातारचे राजकारण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्याच भोवती फिरत आले आहे. या दोघांमधील वाक्ययुद्धाने ते नेहमी चर्चेत असतात. निवडणूक जवळ आली की या दोघा राजेंमध्ये कलगीतुरा रंगतो. आता यात आणखीन एका राजघराण्यातील सदस्याची भर पडणार आहे. माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा पालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पोवई नाक्यावर वृषालीराजे भोसले यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक घातला. त्यानंतर प्रसारमाध्यमासमोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेला मदत करण्यासाठी मी साताऱ्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.वृषालीराजे भोसले म्हणाल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यात माझा जन्म झाला, हे मी माझे भाग्य समजते. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. केवळ अभिषेक, पूजा करून शिवजयंती साजरी करून चालणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या सर्वांना काम करावे लागेल.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे असलेली स्वयंशिस्त आजच्या तरुण पिढीने आपल्या अंगी बाणवायला हवी. शिवरायांनी स्वराज्याचे ध्येय मनात ठेवलं आणि ते साकारलं. त्याच पद्धतीने आपणही ध्येय मनात ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करावी. सातारकरांना मदत करण्यासाठी मी साताऱ्यात आली आहे. सातारा शहरामध्ये रस्ते, पाणी अशा छोट्या-छोट्या समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या मनामध्ये या समस्यांमुळे चिंतेचे वातावरण आहे, त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’
साताऱ्याच्या राजकारणात वृषालीराजे भोसलेंची एंन्ट्री?,
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 4:37 PM