सातारा - पालिकेची पंचवार्षिक निवडणूक जवळ आल्याने सातारा पालिकेतील सत्तारूढ आघाडीने विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. दस्तुरखुद्द आघाडीप्रमुख खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हेच मैदानात उतरल्याने शिलेदारांनी देखील मरगळ झटकली आहे. हद्दवाढीत पथदिव्यांचे उद्घाटन केल्यानंतर खासदारांनी कण्हेर योजना व पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीकडे लक्ष केंद्रित केले असून, बुधवारी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत सातारा पालिकेतील राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते; कारण निवडणुकीचा हा सामना खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे या दोन बंधूंमध्ये रंगलेला असतो. यंदाही हा सामना तितकाच रोमांचकारी असणार आहे, याच शंका नाही.
राजकीय हालचाली गतिमान
निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असताना आता सातारा पालिकेतील सत्तारूढ सातारा विकास आघाडी पूर्ण ताकतीने मैदान उतरली आहे. राजधानी काबीज करण्यासाठी आघाडीने शहरासह हद्दवाढीतील मूलभूत प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टांच्या पहिल्या टप्प्यात हद्दवाढीतील पथदिव्यांचे उद्घाटन खासदारांच्या हस्ते करण्यात आले. आघाडीप्रमुखच मैदानात उतरल्याने त्यांच्या शिलेदारांनीदेखील पायाला भिंगरी बांधली आहे.
‘आम्ही शब्द देत नाही तर तो पाळतोही’ असं सांगून खा. उदयनराजे यांनी विरोधकांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. कण्हेर पाणी योजना, आवास योजना, पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत अशा प्रमुख बाबींकडे सध्या खासदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही दिवसांत कण्हेर योजनेचे उद्घाटन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचादेखील लवकरच नारळ फोडण्याचे त्यांचे नियोजन आहे. निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, परंतु आरोप-प्रत्यारोपांसह विकासकामांचा धडाका सुरू झाल्याने राजधानीतील वातावरण हळूहळू तापू लागले आहे.
मंत्र्यांसोबत चर्चा
शहरातील विविध विकासकामे व योजनांच्या मंजुरीसाठी बुधवारी खा. उदयनराजे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची दरे (ता. महाबळेश्वर) या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये हद्दवाढीतील नियोजित कामे, पाणी योजना, मूलभूत सेवा-सुविधा, अजिंक्यतारा पायथ्याशी उभारण्यात येणारी संरक्षक भिंत, पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत, नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा झाली.
राजकारण असो की वाहन स्टिअरिंग आपल्याच हाती
मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी खा. उदयनराजे भोसले बुधवारी सकाळी शिवसागर जलाशयातून लाँचने दरे या गावी गेले. या गावी जाताना त्यांनी चक्क लाँचचे स्टिअरिंगच आपल्या हाती घेतले. राजकारण असो वा वाहन स्टिअरिंग हे आपल्याच हाती राहणार हे देखील त्यांनी यावेळी दाखवून दिले.