सातारा : ‘सातारा परिसरात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे नगदी पीक घेतले जाते. यासाठी स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र आणि शीतगृह व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. याबाबतचा अहवाल सादर करावा,’ असे आदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवारी) दिले.जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, आमदार शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे आदींसह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच खासदार भोसले म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या विविध योजना काही निकषांमुळे राबविता येत नाहीत. अशामध्ये सुसूत्रता आणण्याविषयी मी खात्री देतो. याबाबत १६ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. ’ ‘माता मृत्यू हे चिंताजनक असून, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यास मी क्षमा करणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला. देशात सातारा परिसरात स्ट्रॉबेरीचे नगदी पीक घेतले जाते. याबाबत एक संशोधन केंद्र आणि शीतगृह उभे राहावे, यासाठी वित्तमंत्र्यांनीही होकार दिलेला आहे. इथले शेतकरी बागायतदार नाही, छोटे आहेत. त्यामुळे संशोधन केंद्र आणि शीतगृह उभे राहिल्यास प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहतील. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गिरीश भालेराव यांनी सादरीकरण केले. उपजिल्हाधिकारी पराग सोमन यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबाबत, कार्यकारी अभियंता जी. एस. मोहिते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत, कार्यकारी अभियंता ए. एस. कोळी यांनी ग्रामीण पाणी पुरवठाबाबत, महावितरण अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी स्वच्छ भारत मिशनबाबत, तहसीलदार सविता लष्करे यांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनेबाबत, सहायक आयुक्त उमेश घुले यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीबाबत, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक संजय वाघ यांनी पंतप्रधान जन-धन योजनेबाबत सादरीकरण केले.यावेळी आमदार शंभूराज देसाई यांनी विविध प्रश्नांबाबत चर्चेत भाग घेतला. सनियंत्रण समिती सदस्यांनीही सूचना केल्या.(प्रतिनिधी)
उदयनराजे भोसले : जिल्हा प्रशासनाला दिले आदेश
By admin | Published: February 13, 2015 9:40 PM