सातारा : शहरात असणाऱ्या जुन्या कारागृहाची जागा सध्या अपुरी पडू लागली आहे. त्याचबरोबर हे कारागृह शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधकाम नियम पाळावे लागत आहे. मात्र, नवीन कारागृह झाल्यानंतर नागरिकांची यातून सुटका होणार आहे. तसेच बंदिवानांना जास्त सुविधा मिळणार आहेत. नव्या कारागृह बांधकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
क्षेत्रमाहुली या ठिकाणी नवीन कारागृहाचे बांधकाम होणार आहे. या जागेची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, कारागृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, सातार्यातील कारागृह हे ब्रिटिशकालीन आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढल्याने हे कारागृह आता अपुरे पडू लागले आहे. क्षमतेपेक्षा बंदिवानांची संख्या जास्त असल्याने पोलिसांवरही ताण येऊ लागला आहे. त्यातच आता सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. कोणतेही कारागृह हे शहरापासून लांब असलेले कधीही चांगले असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बरे पडते. सध्याच्या कारागृहामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होत आहे. सुरक्षेमुळे या परिसरात असणार्या इमारतींची उंची वाढलेली नाही.
हद्दवाढीनंतर सातार्याचा विस्तार वाढणार आहे. शहराचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येत वाढ होणार असल्याने सध्याचे कारागृह हे कमी पडणार आहे. त्यामुळे बंदिवानांची सुरक्षा, सोयी-सुविधा व नागरिकांचा विचार करणे सातारा शहरासाठी नवीन कारागृहाची गरज भासणार आहे.
नवीन कारागृहाची बांधणी झाल्यानंतर जुन्या कारागृहाचा वापर संग्रहालयासाठी केला जाऊ शकतो. तसेच बांधकाम नियमांतून नागरिकांची सुटका होईल. यासाठी नवीन कारागृहाच्या बांधकामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले.
फोटो : १० सातारा माहुली
फोटो ओळ : क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे नव्याने होणाऱ्या कारागृहाच्या जागेची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कारागृहाचे अधिकारीही उपस्थित होते.