सातारा - खासदार उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, आता साताऱ्यात चर्चा रंगली आहे ती, उदयनराजेंच्या सीमोल्लंघनाची. कारण, उदयनराजेंनी किल्ले प्रतापगड येथे आई भवानी मातेची महापूजा केली. त्यावेळी राज्यावर पडलेल्या दुष्काळी वातावरणाचे संकट दूर व्हावे, असे साकडेही घातले. त्यानंतर, शाही सिमोल्लंघनाची तयारी करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आपल्या इशारातून निवडणुकांचे संकेत देत आहेत. सातारची जनता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशी सूचना उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली. जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा विकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका तसेच विविध ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शाही सिमोल्लंघानाचा आग्रह धरला. त्यावेळी स्मीतहास्य करुन उदयनराजेंनीही मी असतोच, तुम्हीही या असे म्हणत कार्यकर्त्यांना शाही सिमोल्लंघनाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे शाही सिमोल्लंघनाच्या माध्यमातून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे दिसून येते. तर विजयादशमीचे सिमोल्लंघन हे अनेक राजकीय नेत्यांसाठी शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.