सातारा : साताऱ्यातील जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची गळाभेट झाली. ही सदिच्छा भेट असली तरी दोघांमध्ये राजकीय चर्चाच अधिक झाली. दोघेही आता जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत साताऱ्यात बैठक घेण्यात येणार आहे.
माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे साताऱ्यात काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर ते पुढील नियोजित कामासाठी जाणार होते. साताऱ्यात आल्यावर त्यांनी भाजपचे खासदार उदयनराजे यांची जलमंदिरमध्ये भेट घेतली. रविवारी दुपारी चारच्या सुमारास आल्यानंतर त्यांनी उदयनराजेंशी जवळपास एक तासभर चर्चा केली. ही चर्चा प्रामुख्याने जिल्ह्यातील राजकीय विषयांवरच होती तसेच मराठा समाज आरक्षणावर उदयनराजेंनी भूमिका घेतली आहे. त्यावरही रणजितसिंह यांनी चर्चा केली. या चर्चेत जिल्ह्यात भाजप पक्ष वाढविण्यावर अधिक भर होता, असे सांगण्यात आले. मात्र, सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये झालेली भेट काहीतरी राजकीय घडामोडी घडविणार का ? याविषयीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उदयनराजेंबरोबर सदिच्छा भेट होती. जिल्ह्यात भाजपवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
फोटो दि.१४सातारा भाजप फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांची रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली.
.....................................................