सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणात व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही समाजाबद्दलच्या तळमळीतून व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी जात-पात मानली नाही, हे उदयनराजेंना सल्ले देणाºयांनी लक्षात घ्यावं आणि त्यांच्यासारखंच खरं बोलण्याचं धाडस दाखवावं,’ असे मत माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी व्यक्त केले.त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांनी जे मत व्यक्त केले, त्याला माणुसकीची झालर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीयांबरोबरच शहराचे नगराध्यक्ष करत असताना उदयनराजे किती निस्वार्थी आणि सरळ मनाचे आहेत, याचा प्रत्त्यय वेळोवेळी आला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा कोणी कसाही अर्थ लावून त्यांना अगांतूक सल्ले देत आहेत.
लोकशाहीत बोलण्याच अधिकार प्रत्येकाला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असल्याने त्यांच्या प्रतिक्रियेची गरज प्रसारमाध्यमांना वाटते. याच मुलाखतीत खासदार उदयनराजेंनी ‘एखाद्या व्यक्तीला रक्त लागले तर आपण जात पाहून रक्त घेतो का? मग जाती-पातीवर अशा दंगली का होतात?,’ असा मार्मिक सवाल मुलाखतकारास उदयनराजेंनीच विचारला होता. उदयनराजेंनी दिलेल्या मुलाखतीचे विश्लेषण करताना काहीजण शब्दछल करत आहेत. प्रत्येक शब्दाचे वेगळे अर्थ काढून त्यांनी संसदेत बोलायला पाहिजे होते, त्यांनी अभ्यास करून बोलावे, आदी प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्यावर पूर्वग्रहदूषित वृत्तीतून न पाहता सरळ आणि माणुसकीच्या भावनेतून पाहिल्यास उदयनराजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलले आहेत, हे सर्वांनाच जाणवेल. म्हणूनच उदयनराजेंना सल्ले देण्यापेक्षा समाजबांधवांनी त्यांचा दृष्टिकोन स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षाही बडेकर यांनी व्यक्त केली आहे.उदयनराजेंची जाहीर माफी मागावी..निखील वागळे यांनी उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदनात असे म्हटले की, वागळे यांनी मुलाखतीमध्ये ‘त्यांना किंमत द्यायची गरज नाही. ते जातीयवादी राजकारण करतात,’ असे अपमानजनक वक्तव्य केले आहे. या घटनेबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकावर सोहेल आतार, वसीम मोमीन यांनी सह्या केल्या आहेत.