सातारा : ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत जे घडले त्याची गांभीर्याने पक्षाने दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची दिशा ठरली आहे. पक्षाच्या खासदारांनी त्यांची दिशा ठरवावी. कुणीही किती आघाड्या काढून आवाहने दिली तरी बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आहे,’ असा टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला. दरम्यान, गुरुवार, दि. १२ जानेवारी रोजी अजिंक्यतारा कारखाना स्थळावर पक्षाचे नेते खासदार शरद पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करून प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनामध्ये गुरुवारी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत जिल्हा परिषदेतील अविश्वास ठराव आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत जे घडले त्यासंदर्भात पक्षातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या नाराजीची पक्षाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. खासदार उदयनराजेंच्या राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडीविषयी छेडले असता रामराजे म्हणाले, ‘१९९९ मध्ये पक्षात हे होते का? तरीही पक्षाने यश मिळविलेच ना, असा टोला उदयनराजेंचे नाव घेता लगावून खासदारांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, पक्षाची दिशा ठरली असल्यामुळे त्यांनी त्यांची दिशा ठरवावी. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बंडखोरी होणार नाही, याची दक्षता घेऊन जे पक्षाशी प्रामाणिक आहेत त्यांनाच पक्ष उमेदवारी देणार आहे. जिल्ह्यात पक्ष कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. कुणाच्याही दबावाखाली पक्ष नाही. मागच्या वेळी जे घडले ते आता या निवडणुकीत घडणार नाही. कुणाच्या ढवळाढवळ करण्याने मतदार संघात फरक पडणार नाही. जे काही घडणार आहे ते वेळ आल्यावरच कळेल,’ असेही रामराजे यांनी सुनावले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘सहा महिन्यांत जिल्ह्यात जे घडले त्यांची दखल पक्षपातळीवर घेतली आहे. शरद पवार यांच्यापर्यंत जिल्ह्यातील घडामोडींची चर्चा झालेली आहे. १२ जानेवारी रोजी सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याच्या उपक्रमांचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. होणाऱ्या मेळाव्यात पक्षाची भूमिका शरद पवार जाहीर करणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेतील अविश्वास ठराव, विधान परिषद निवडणूक याची दखल घेऊन पक्षात बंडखोरांना थारा दिला जाणार नाही. जे पक्षाशी प्रामाणिक आहेत, अशा उमेदवारांनाच पक्ष उमेदवारी देणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. साताऱ्यातील या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) सत्ता जाण्यास कऱ्हाड की बारामती दोषी? बारामतीमुळे राज्यात आघाडीची बिघाडी झाली, असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी केले होते. यावर शशिकांत शिंदे यांनी राज्यातील सत्ता कऱ्हाडच्या माजी मुख्यमंत्र्यांमुळे की, बारामतीमुळे गेली हे आनंदराव पाटील यांनी राज्यातील काँग्रेसच्या आमदारांना विचारावे असे सुनावले.
उदयनराजेंनी त्यांची दिशा ठरवावी : रामराजे
By admin | Published: January 05, 2017 11:54 PM