सातारा : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षापासून अत्यंत दूर गेलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी चक्क शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुण्याहून हे दोघे एकत्र साताऱ्यात आले, तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे अक्षरशः विस्फारले गेले. विजयादशमीचा 'शाही दसरा सोहळा' साताऱ्यात साजरा झाल्यानंतर उदयनराजे पुण्यातच होते. बुधवारी शरद पवारांचा सातारा जिल्हा दौरा ठरविण्यात आला होता. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे अन् राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील बहुतांश नेते यांच्यातील वाद प्रचंड उफाळला असतानाच मंगळवारी दोघांचे मोबाईलवर बोलणे झाले होते. त्यानंतर आज सकाळी ते एकत्र भेटले. 'चर्चा करतच साताऱ्याला जाऊ,' असे ठरल्यानंतर शरद पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलाविले. उदयनराजे पवारांच्या गाडीत बसले खरे परंतु त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने थेट गाडीची चावीच आपल्या हातात घेतली. ड्रायव्हिंग सीटवर राजे बसले तर शेजारी शरद पवार. पुण्याहून साताऱ्याला येताना त्या दोघांमध्ये बरीच राजकीय चर्चा झाली. साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात ही गाडी आल्यानंतर उपस्थितांना प्रचंड धक्का बसला. सध्या सातारा नगरपालिकेतील घंटागाडी आंदोलनावरून राजमाता कल्पनाराजे अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात पत्रकबाजीचा प्रचंड धुरळा उडाला आहे. उदयनराजेंच्या विरोधात दाखल झालेल्या खंडणी गुन्ह्यातही 'फलटण'चा हात असल्याचा आरोप केला गेला होता.त्यावेळी भिलार मुक्कामी शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 'आजूबाजूची माणसे नेत्याला गोत्यात आणतात. त्यामुळे चांगली माणसे पारखून जवळ बाळगावीत.' या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा प्रवासात पवारांनी उदयराजेंना कोणता कानमंत्र दिला, याची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्याच आठवड्यात राजेंच्या ताब्यातील आनेवाडी टोलनाकाही काढून घेतला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर पवारांची गाडी राजेंनी चालविली, याला सातारा जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. बुधवारी दिवसभर शरद पवार सातारा जिल्ह्यात असून या ठिकाणी राजे त्यांच्यासोबत असणार काय, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
खासदार उदयनराजेंनी केले शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 10:11 AM
सातारा : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षापासून अत्यंत दूर गेलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी चक्क शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुण्याहून हे दोघे एकत्र साताऱ्यात आले, तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे अक्षरशः विस्फारले गेले.
ठळक मुद्देपुणे ते सातारा दोघांचा एकत्र प्रवास .