सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या भूमिकेवर आपणही ठाम आहे. मात्र, या भूमिकेशी विसंगत भूमिका असलेल्या संभाजी भिडे यांच्यासह सर्वांच्या भूमिका आपल्याला अमान्य आहेत,’ असे पत्र खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटणकर म्हणाले, ‘सध्या होत असलेली निवडणूक ही शेवटची निवडणूक असल्याचे भाजपचे खासदार साक्षी महाराज सांगत आहेत. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. चळवळीत आंदोलन करण्याचे अधिकार लोकशाहीमुळे मिळाले. ते अधिकार वाचविण्याची निवडणूक ही संधी आहे.’
श्रमिक मुक्ती दलाने तयार केलेला जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचे पत्र खा. उदयनराजे यांनी दिले आहे. मतदार संघात समन्यायी पाणी वाटप तत्त्व लागू करून प्रत्येक कुटुंबाला किमान ५ एकरांचे बारमाही बागायत करण्यासाठी सार्वत्रिक बंद पाईप योजना लागू करणार. तसेच विकेंद्रित अत्याधुनिक कृषी उद्योग शासनाच्या बीज भांडवलाच्या आधारावर रोजगार निर्मिती करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी लेखी पत्र दिले आहे.
दरम्यान, खा. उदयनराजेंनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास आपण काय भूमिका घेणार? असा प्रश्न पाटणकर यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘त्यांनी आश्वासनांची पूर्तता न केल्यास खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जाईल. मागील पाच वर्षांप्रमाणे आम्ही यावेळी गाफील राहणार नाही,’ असे पाटणकर यांनी सांगितले.
दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकरांना यांच्यासोबत जातीअंताच्या लढाईत आम्ही अनेक वर्षांपासून सोबत काम करत आहोत. यापुढेही हे कार्य सुरूच राहील, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.