सातारा - सहकारी संस्था या सभासद जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता स्थापन केल्या जातात. सभासदांचे जीवनमान उंचावणे हे सहकाराचे मूलतत्त्व किंवा गाभा आहे. सहकार तत्त्वांना तिलांजली देत, महाराष्ट्रात काही सहकारी संस्था कशा गिळंकृत केल्या गेल्या याविषयी वस्तुस्थिती मांडली. जे प्रकार घडले आहेत, त्याची आम्ही फक्त जाहीर वाच्यता केली. या वाच्यतेमध्ये कोणत्याच आमदारांचा किंवा कोणत्या कारखान्याचा नामोल्लेख आम्ही केलेला नव्हता, तथापि खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आपल्या राज्यात, देशात सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्था कशा मोडीत काढल्या गेल्या आहेत हे सर्वांच्या समोर आहे. सहकारी संस्थांतील सभासद मालक सभासद असूनही, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांची कशी कामगार-मजुराप्रमाणे पिळवणूक केली जाते याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशा सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार, सहकारी संस्थांचे सभासद जे खरे मालक आहेत, त्यांनी आपल्या मालकी अधिकारांचा वेळीच वापर करून अशा स्वाहाकारी आणि स्वार्थी विचारधारेच्या व्यक्तींकडून संस्था खाजगीकरण होण्यापूर्वी सभासदांनी ताब्यात घ्याव्यात असे सर्वसाधारण वक्तव्य केले होते.
आमचे ते वक्तव्य फक्त आणि फक्त यांनाच झोंबले. वास्तविक आमच्या सर्वसाधारण भाष्यावर त्यांनी इतकी आगपाखड करण्याचे कारण नव्हते. ते अगदी व्यक्तिगत बाबींवरही घसरल्याचे पहायला मिळाले. वय वाढले की बुद्धी भ्रष्ट होते अशी अजब संकल्पना मांडली. त्यांनी त्यांच्या पेक्षा सर्वच ज्येष्ठ असणाऱ्यांच्या बाबतीत त्यांची असलेली वैचारिक दिवाळखोरी याद्वारे दाखवून दिली. कदाचित मानसिक संतुलन तात्पुरते का होईना त्यांचे बिघडले असावे. वाढत्या वयाप्रमाणे प्रगल्भता वाढण्याऐवजी बालिशपणाच वाढला असल्याने दु:ख वाटते असे उपरोधक भाष्य उदयनराजेंनी केले आहे.