सातारा : ‘ग्रामपंचायत, सोसायटीपासून ते नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये लोकांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण कोण निर्माण करते, हे समस्त सातारकरांसह जिल्ह्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे. देवस्थानाच्या नावाखाली जमिनी काढून घेतो, घरे पाडतो, अशा धमक्या देऊन दहशतीवर राजकारण करणारे उदयनराजे म्हणजे उथळ पाण्याचा खळखळाट आहे,’ अशी सणसणीत चपराक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावली. दरम्यान, आदरयुक्त दहशत म्हणून स्वत:च्या क्रूकर्मावर पांघरुण घालणाऱ्या खासदारांनी उलट्या बोंबा मारण्यापेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढावे आणि त्यांचा सातबारा कोरा करून जनतेमधील आदर कृतीतून दाखवावा,’ असे खुले आव्हानही त्यांनी दिले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘राष्ट्रवादीने झिडकारल्यानंतर ‘ना घर का ना घाट का’ अशी परिस्थिती झालेल्या खासदारांना नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली किंमत काय, हे दिसले आहे.राजधानी जिल्हा विकास आघाडी काढून येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला पायघड्या टाकायच्या आणि आघाडीसाठी विनवण्या करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणाऱ्या खासदारांना जिल्ह्यात सोडाच; पण सातारा तालुक्यातही चिन्हावर उभे करण्यासाठी उमेदवार मिळाले नाहीत. हीच का तुमची आदरयुक्त दहशत. आहे.राजधानी विकास आघाडी स्थापन करून जिल्ह्याचे नेते व्हायला निघालेल्या खासदारांवर कोणीही विश्वास दाखवू नये, हीच का त्यांची विश्वासार्हता? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला साथ देऊन खासदारांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. खासदार मतदार संघाचे नव्हे तर, केवळ सातारा तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले. यावरूनच बुडत्या जहाजात कोण आहे, हे लक्षात घ्यावे. आमच्या आमदारकीची चिंता करण्यापेक्षा तुमच्या खासदारकीची आत्ताच काय अवस्था झाली आहे, याचे चिंतन खासदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी करावे,’ असा उपहासात्मक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.नगरपालिका निवडणुकीत आम्ही गाफील राहिल्याने खासदारांनी कुटुंबीयांचा आधार घेऊन अंधारातून वार केला. त्यामुळे आम्हाला अपयश आले. मात्र, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत समोरासमोर दोन हात करण्याची वेळ आल्यावर खासदारांची काय अवस्था झाली, हे जिल्ह्याने पाहिले आहे. शब्दांचा खेळ करून पोळी भाजू पाहणाऱ्या खासदारांची दहशत सर्वसामान्यांनीच मोडून काढली आहे. जमिनीवरील शिक्क्यांचा मुद्दा अंगलट आल्यानंतर जावळीत सातबारा कोरा करण्याची खासदारांची वल्गना हवेत विरली आहे. सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, माण तालुक्यांतील गोरगरीब जनतेच्या शेतजमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्के मारून खासदारांनी आदरयुक्त दहशत निर्माण केली, असे म्हणायचे का? निवडणुकीत पराभव समोर दिसू लागला की, रात्री-अपरात्री लोकांच्या घरी जाऊन दमदाटी करायची. घरे पाडू, जमिनी विकू अशा धमक्या देऊन मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार कोण करते, हे सर्वश्रूत आहे. सर्वसामान्यांनी दहशत मोडीत काढल्यानंतर पराभव लपवण्यासाठी, सारवासारव करण्यासाठी खासदार बालीश वक्तव्य करत असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. (प्र्रतिनिधी)‘आदरयुक्त दहशत’ असे गोंडस नामकरण‘गुंडागर्दीला, दबावतंत्राला आदरयुक्त दहशत, असे गोंडस नामकरण करणाऱ्या खासदारांनी खासदार म्हणून आजवर नेमके काय केले, हे एकदा जनतेला सांगावे. नगरपालिकेच्या निवडणुकीत वल्गनांचा वर्षाव करणाऱ्या खासदारांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सातबारा कोरा करण्याची वल्गना केली. आता निवडणूक संपली आहे. बोलबच्चनगिरी करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा खासदारांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के हटवण्याच्या वल्गनेचे पुढे काय झाले? शेतकऱ्यांचे सातबारे कधी कोरे करणार? याचे उत्तर दिले पाहिजे,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
उदयनराजे म्हणजे उथळ खळखळाट
By admin | Published: March 10, 2017 10:18 PM