सचिन काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कुठेही गेलेले नाहीत. सर्वजण इथेच आहेत. बोलावलं असतं तर चर्चेला आम्हीदेखील आलो असतो. घरपट्टीच्या विषयावरुन जनतेची दिशाभूल करुन चुकीचे आरोप करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही,’ असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला.
सातारा पालिकेच्या बहुचर्चीत घरपट्टीच्या विषयावरुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शुक्रवारी दुपारी पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर घरपट्टीबाबत खा. उदयनराजे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान देतानाच सातारा विकास आघाडीवरही त्यांनी जोरदार टीका केली. या टीकेला खा. उदयनराजे यांनी शुक्रवारी सायंकाळी जलमंदिर पॅलेस येथे पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
ते म्हणाले, ‘पूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका सर्व सत्ताकेंद्रे तुमच्याकडे होती. त्यावेळी जनतेच्या विकासाची कामे का झाली नाहीत. उलट सातारा विकास आघाडीने हद्दवाढ भागासाठी गेल्या तीन वर्षांत शासनाकडून १२४ कोटींचा निधी मंजूर करुन आणला. या भागात रस्ते, दिवे, पाणी योजना अशी कामे टप्प्याटप्प्याने केली जात आहे.घरपट्टीबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. काही लोकांना याबाबत अडचणी असतील तर त्या समजून घेतल्या पाहिजेत. हद्दवाढ भागात अधिकारी व कर्मचारी नेमून लोकांच्या तक्रारी दूर कराव्यात, अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे जनतेच संभ्रम निर्माण होईल, असे कृत्य करु नये.
सातारा विकास आघाडी भ्रष्ट आघाडी आहे, या आघाडीने पालिका लुटून खाल्ली असे आरोप सातत्याने केले जातात. याबाबत छेडले असता उदयनराजे म्हणाले, ‘सत्ता तुमच्याकडेही होती. त्यावेळी तुम्ही लोकहिताची कामे केली असती तर सातारा विकास आघाडीची स्थापणाच झाली नसती. राहिला प्रश्न भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा तर आमची ईडी चौकशी लावा. आमच्या मागे ज्यांची सत्ता होती त्यांची देखील चौकशी होऊन जाऊदे. सातारा एमआयडीच्या विकासाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उदयनराजे म्हणाले.