सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या आक्रमक स्वभावाबाबत संपूर्ण राज्याला माहित आहेत. त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्याच पक्षातीलच काय पण विरोधी पक्षातील लोकांचीही तंतरते. त्यांच्या या आक्रमकपणाची साक्ष सोमवारी अनेकांना पाहायला मिळाली. शिवसेनेचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांची त्यांनी विश्रामगृहावर गळाभेट घेतली. या भेटीआधी त्यांनी हॉलमधील राष्ट्रवादी व काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी बाहेर जावे, इथे फक्त बीजेपी अन शिवसेनेचे लोक थांबतील, असे सांगून पक्षाला घरचा आहेर दिला.पालकमंत्री विजय शिवतारे जिल्हा दौऱ्यावर असताना सातारा येथील शासकीय विश्रामगृहात उदयनराजेंनी त्यांची गळाभेट घेतली. एंट्रीवेळीच त्यांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांसोबत जिल्ह्याविषयी तसेच सातारा पालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीची चर्चा जिल्हाभर गाजत आहे. विजय शिवतारे व उदयनराजे भोसले हे दोघेही अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादीकडे सत्ता असतानाही बहुतांश कार्यक्रमांना उदयनराजे हजेरी लावत नसत. मात्र, त्यांनी शहर तसेच जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांची बराच वेळ चर्चा केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उदयनराजेंनी पालकमंत्र्यांसोबत हजेरी माळावरील शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाला भेट दिली. या वस्तू संग्रहालयाचे काम गेल्या ६ वर्षांपासून बंद स्थितीत आहे. याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे काम श्रेयवादात अडकले आहे. या जागेऐवजी जुन्या राजवाड्यात हे वस्तू संग्रहालय झाले असते तर खूप कमी पैशांत व ऐतिहासिक जागेतच ते झाले असते व ही जागा दुसऱ्या चांगल्या कामासाठी वापरता आली असती; परंतु श्रेय कुणी घ्यायचे यावरुन राजकारण करुन चांगले काम कसे बिघडते, याची खंत त्यांनी पालकमंत्री शिवतारे यांना बोलून दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, सुजाता गिरीगोसावी, नगरसेवक विजय बडेकर, माधुरी भोसले, आशा पंडित, अॅड. शिरीष दिवाकर, किशोर पंडित, शिवाजी भोसले व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उदयनराजे-शिवतारे गळाभेट!
By admin | Published: January 27, 2015 9:31 PM