सातारा : लोकसभेच्या जागांसाठी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट सातारा गाठत खासदार उदयनराजेंची भेट घेतली. उदयनराजेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवारांनी राष्ट्रवादीतून तिकीट पक्के झाल्याचे सांगत त्यांची इच्छाही व्यक्त केली आहे. आता उदयनराजे पवारांची ही इच्छा पूर्ण करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उदयनराजेंनी भाजपसोबतही जवळीक वाढविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर जात त्यांची स्तुतीही केली होती. तसेच पत्रकारांशीही ते खुलेपणाने बोलत होते. यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होत होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पटत नसल्याने उदयनराजे पक्षाच्या प्रचारापासून दूर राहत होते. यामुळे पवारांनी साताऱ्यात भेट घेत उदयनराजेंना तिकीट पक्के असल्याची खात्री दिली. तसेच राज्यभरात पक्षाचा प्रचार करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
उदयनराजेंवर प्रेम करणारे आणि त्यांची क्रेझ असलेले अनेक तरुण राज्यभर आहेत. त्यांच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलचीही बरेचजण कॉपी करतात. या तरुणाईला राष्ट्रवादीकडे वळविल्यास त्याचा लोकसभेसह विधानसभेलाही फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे पवारांनी त्यांना राज्यभर पक्षाच्या प्रचारासाठी येण्याचा सल्ला दिला आहे.