मुंबई/सातारा - लोकप्रिय लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या सोशल मीडियात आणि लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळेच, तिच्या गाण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होते. नुकतेच तिने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे लावणीचा कार्यक्रम केला. तो कार्यक्रम वादग्रस्त ठरला असून पोलिसांनी गौतमी आणि आयोजकांवरही गुन्हा दाखल केला आहे. तर, एका कार्यक्रमात चक्क महिलांच्या गर्दी उतरुन गौतमीने डान्स केल्यामुळेही ती चर्चेत आली होती. आता, गौतमीने जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर तिने उदयनराजेंचा स्वभाव खूप छान असून त्यांना कलाकारांची जाण असल्याचं मह्टलंय.
मी पहिल्यांदाच महाराजांना भेटले, त्यांना भेटून खूप छान वाटलं. मी जाताना बुके आणि एक परफ्यूम घेऊन गेले होते, महाराजांना परफ्यूम खूप आवडतो, असं मला समजलं. महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज मी इथे आल होते, असे नृत्यांगणा गौतमी पाटीलनेउदयनराजे भोसले यांच्या भेटीनंतर म्हटले. तसेच, महाराजांना कलाकारांची जाण आहे, त्यांचा स्वभाव खून छान आहे, असेही तिने म्हटले. तुम्ही दोघेही लोकांच्या मनावर राज्य करता असा प्रश्न विचारताच गौतमीने मी एवढी मोठी नाही, असे म्हटले. उदयनराजेंसोबत माझं नाव घेऊ नका, ते खूप मोठे आहेत, मी खूप लहान आहे. त्यामुळे, त्यांच्यासोबत माझं नाव घेऊ नका, तसंल काही कॉम्बिनेश करू नका. ते आज आपल्या सर्वांना बघतात, ते आपलं दैवत आहेत, त्यांना भेटून छान वाटलं, असं स्पष्ट मत गौतमीने व्यक्त केलं.
गौतमीच्या कार्यक्रमाला सध्या चांगलीच गर्दी खेचली जात असून अनेक ठिकाणी तिला बोलावण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका बैलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही गौतमीला बोलावून तिच्या शो चं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गौतमीबद्दल भाष्य करताना, तिला तिचा कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे, तो तिच्या उत्पन्नाचं साधन असून तिची कलाही आहे, असे म्हटले होते. आता, उदयनराजेंची भेट घेतल्याचे गौतमीने स्वत: माध्यमांशी बोलताना सांगितले.