सातारा : सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मोर्चे होईपर्यंत त्याबाबत निर्णय न झाल्यास मुंबईत ५ कोटींचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले यांनी करावे, असा ठराव राज्यातील विविध संघटनांनी केल्याची माहिती विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्यभरातील विविध संघटनांचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी खासदार उदयनराजेंनी नेतृत्व न स्वीकारल्यास जलमंदिरात ठाण मांडण्याचा इशाराही दिला आहे.राजधानी साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबरला मराठा महामोर्चा होणार असून, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यात मराठा समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. साताऱ्यातील महामोर्चापूर्वी राज्यभरातील विविध ३० ते ३५ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक साताऱ्यात झाली. यात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चानिमित्त असणाऱ्या मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. मुंबईत होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व उदयनराजे यांनी करावे, असा ठरावही करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाषदादा जावळे, अशोक पाटील-कोपळेकर, तुषार काकडे, राजेंद्र गडकर, शैलेश सरकटे, अनिल साळुंखे, रेश्मा पाटील, धनाजी पाटील, रामेश्वर शिंदे, शिवाजी महाडिक, अनिल वाघ, दयानंद पाटील, राजेंद्र पाटील, विशाल सावंत, संतोष पाटील, महेश निंंबाळकर, सुनील मोरे आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठा महामोर्चामुळे नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे जयकुमार गोरे : माझा केवळ पाठिंबाच नव्हे तर मी मराठा समाजासोबतचसातारा : ‘संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. कोपर्डी प्रकरणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने समाज रस्त्यावर आला आहे. या समाजाच्या मनातील खदखद बाहेर पडत आहे. कुठलेही नेतृत्व नसताना समाजाने दाखविलेल्या एकीमुळे सर्वच नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे,’ असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.आमदार गोरे म्हणाले, ‘कोपर्डी प्रकरणामध्ये आत्तापर्यंत दोषारोपत्र दाखल होणे गरजेचे होते. मात्र, शासनाने यामध्ये खूपच विलंब केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा खटला जलद न्यायालयात घेऊन त्यांना तत्काळ फासावर लटकवा. मराठा समाजाची या कोपर्डी प्रकरणाच्या निमित्ताने मनातील खदखद बाहेर आली आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे, अशी माझीही मागणी आहे. आरक्षणाचे बिल पास होताना मी त्याचा साक्षीदार आहे. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी मंत्रिमंडळात आघाडी शासनाच्या काळात केली होती. आत्ताही ही मागणी रास्त आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे, तसेच मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, ही सुद्धा प्रमुख मागणी आहे. या मागण्यांना माझा पाठिंबा आहेच, शिवाय मी मराठा समाजासोबतच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबईच्या मोर्चाचे नेतृत्व उदयनराजेंनी करावे
By admin | Published: September 30, 2016 1:10 AM