सातारा/नवी दिल्ली - राज्यानंतर आता दिल्लीच्या राजकारणतही मोठा भूकंप घडली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नेतृत्व मान्य केलं आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यासाठी, एकनाथ शिंदे आज दिल्लीत गेले होते. या दिल्ली दौऱ्यात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी निधीची मागणी केली. त्यास, तत्वत: मंजूरीही देण्यात आली आहे.
मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा ऐतिहासिक नगरीतील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या नुतनीकरणासाठी सातारा नगरपरिषदेने राज्य शासनास सादर केलेल्या १६ कोटी १४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्वतः मंजूरी दिल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. उदयनराजेंनी ट्विटवरुन या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मूळ सातारा जिल्ह्यातीलच असून मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उदयनराजेंची ही पहिलीच भेट आहे. राजधानी दिल्लीत ही भेट झाली.
उदयनराजेंनी रावसाहेब दानवेंचीही घेतली भेट
शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा रेल्वेस्टेशन व सातारा जिल्ह्यातील रेल्वे विभागातील विविध नवीन विकासकामांना व प्रलंबित कामांना लवकरच प्रारंभ होणार. यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केल्याचेही उदयनराजे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितले.
संजय राऊतांवर उपहासात्मक टिका
आमदारानंतर आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. कारण, शिवसेना आमदारांनी फुटल्यानंतर भूमिका मांडताना संजय राऊत यांनी लक्ष्य केलं. आता, खासदार उदयनराजे भोसलेंनीही संजय राऊतांवर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे देव आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका. माझा दिवस चांगला जाऊ द्या, असे म्हणत उदयनराजेंनी संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टिका केली.