सातारा : लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबतच आमदार शिवेद्रसिंहराजे यांनी मिसळपावचा आस्वाद घेतला होता. त्याची खमंग चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा नरेंद्र पाटलांचा मिसळयोग जुळून आला. मात्र, या खेपेला त्यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले होते.प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या आदरातिथ्याच्या निमित्ताने नरेंद्र पाटील यांनी पुन्हा एकदा राजेंचा मिसळपावचा पाहुणचार घेतला. सुरूची बंगल्यावर याचीही खुमासदार चर्चा झालीच.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या तीन दिवसीय प्रवासाला शुक्रवारी सातारा येथून सुरूवात केली. सातारा येथे जलमंदिर निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. जयकुमार गोरे, माथाडी कामगार संघटनेचे नरेंद्र पाटील, मनोज घोरपडे, अतुल भोसले, दिलीप येळगावकर, सुनील काटकरही यावेळी सोबत होते. खासदार उदयनराजे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोघांत मिसळीचा आस्वाद घेत राजकीय चर्चा झाली.यानंतर थोड्याच वेळात बाहेर पडलेल्या बावनकुळेंच्या गाड्यांचा ताफा ‘सुरूची’ निवासस्थानी आला. त्यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वागत केले. त्यांच्यासाठी तेथेही चहा-नाश्ता झाला. यावेळी जलमंदिरातल्या मिसळीचा उल्लेख झालाच. आमदार शिवेंद्रराजे यांनी लगेच नरेंद्र पाटील यांच्याकडे बोट दाखवत यांच्यामुळे यावेळी मिसळ ठेवली असेल, असे सांगितले. अखेर आमच्या कार्याची दखल घेतली, असेही नमूद केले.साताऱ्याचे दोन्ही राजे राष्ट्रवादीत असतानाच तत्कालीन लोकसभेला शिवसेनेतून लढणाऱ्या माथाडी कामगारांचे नरेंद्र पाटील यांनी आव्हान उभे केले होते. त्यावेळी साताऱ्यात आलेल्या नरेंद्र पाटील यांची आणि आमदार शिवेंद्रराजे यांची भेट झाली. दोघांनी चंद्रविलास हॉटेलमध्ये मिसळीवर ताव मारला. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदारांविरोधातील उमेदवारासमवेत राष्ट्रवादीच्या आमदारांची अशी झालेली भेट राजकीय की खासगी अशी चर्चा रंगली. त्यानंतर सातारची मिसळ भलतीच प्रसिद्धी झाली. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा मिसळयोग जुळून आला. मात्र, सध्या दोन्ही चुलत बंधू भाजपात आहेत इतकंच.
उदयनराजे-नरेंद्र पाटलांनी जलमंदिरमध्ये घेतला मिसळपावचा आस्वाद, ठसका लागला सुरूचीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 5:07 PM