मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून उद्धव ठाकरे गटाला धक्कातंञ देण्याची तयारी करण्यात येत असल्याचे राजकीय घडामोडींवरुन दिसत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे अजित यादव यांच्या कारभाराला कंटाळून व वरिष्ठांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेना भवनात जाऊन राजीनामा देणार असल्याची माहिती एका पदाधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. याबाबत सोशल मीडीयावर जोरदार शितयुध्द सुरु आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खंडाळा तालुक्यामध्ये या फुटीचा जास्त प्रभाव दिसून आला नव्हता. यामध्ये काही मोजके पदाधिकारी सोडले तर उर्वरित ठाकरे गटातच होते. दरम्यान, जिल्ह्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनाच ठाकरे गटात आणत जिल्ह्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षच संपविण्यात यश आले होते.दरम्यान, ठाकरे गट खंडाळा तालुक्यात मजबूत होण्याचे संकेत मिळत असताना तालुक्यातील पदाधिकारी व जिल्ह्यातील वरिष्ठांमध्ये विस्तव पडत शितयुध्द सोशल मिडीयावर जोरदार सुरु झाले. यामध्ये खुद्द खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे यांनी सोशल मिडियावर वरिष्ठ पदाधिका-यांवर टिकास्ञ सोडत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी नावापुरते ठाकरे गटात असून शिवसेना नेतृत्वाने दिलेला सभासद नोंदणी व प्रतिज्ञापत्र नोंदणीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यामध्येच शिंदे गटाकडे गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी अदयापही जाणिवपूर्वक नियुक्त्या केलेल्या नाहीत त्यामुळे संघटना बांधणी झालेली नाही. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या असवली, शिरवळ ग्रामपंचायत निवडणुकीतही शिवसेना ठाकरे गटाचे साधे उमेदवारही उभे करण्यात पदाधिका-यांनी स्वारस्य दाखविले नसल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.शिरवळ सारख्या महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये केवळ शहरप्रमुख विजय गिरे यांच्या पत्नी रुपाली गिरे या उभ्या राहून स्वबळावर विजयी झाल्या आहे. परंतू निवडणूक संदर्भाने पदाधिकार्यांनी कोणतीही बैठक न घेता दुर्लक्ष केले आहे. यामध्येच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अजित यादव यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत तर शिंदे गटातील सातारा माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे अजित यादव हे शिंदे गटात प्रवेश करणार का? यावरुन सध्या चर्चेला उधाण आले आहे.
तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्नशील असून दोन दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिका-यांची बैठक खंडाळा याठिकाणी खेळीमेळीमध्ये झाली आहे. लवकरच नेत्या सुषमा अंधारे यांची सभा घेण्याचे नियोजन सुरु असून आम्ही सर्व एकसंघ आहे. मिंदे गटामध्ये माझा जाण्याचा कोणताही प्रश्न नाही. - अजित यादव - उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट) वैयक्तिक व राजकीय विचारधारा हे वेगळ्या असून वैयक्तिक कामानिमित्त मंञी, आमदार यांच्या भेटीगाठी ह्या होत असतात. उपजिल्हाप्रमुख अजित यादव हे कडवट शिवसैनिक असून ते कोठेही पक्षप्रवेश करणार नसून सदरील गोष्टी तथ्यहिन आहे. याबाबत अजित यादव यांनी वरिष्ठांकडे योग्य तो खुलासा केला आहे. - सचिन मोहिते, जिल्हाप्रमुख, शिवसेना(ठाकरे गट)