सातारा: ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उध्दव ठाकरे यांनी फडतूस शब्दाचा वापर केला. मात्र, फडणवीस यांचे नेतृत्व कार्यक्षम आहे. सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळेच ठाकरे असे बोलत असावेत. आता त्यांना त्यांच्या आमदारांनीही नाकारलंय,’ अशी जोरदार टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
सातारा शहरात भाजपच्यावतीने सावरकर गाैरव यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी ही टीका केली. भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली. यात्रेत विकास गोसावी, निलेश मोरे, राहुल पवार, धनंजय जांभळे, अमोल मोहिते, राजू गोरे, सूनेशा शहा, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे आदींसह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरातील पोलिस करमणूक केंद्रापासून या यात्रेला सुरवात झाली. यात्रा पोवई नाक्यावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवेंद्ररासिंहराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘काँग्रेस व राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी होत आहे. महापुरुषांचा अपमान करण्यामुळेच काँग्रेसची देशात वाताहात झाली आहे. आतातरी त्यांनी सुधारण्याची गरज आहे. कारण, महात्मा गांधी व पंडीत नेहरु यांची काँग्रेस संपली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नामकरणाच्या विरोधातही खतपाणी घालण्याचे काम काँग्रेस करतेय. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करण्याचाच हा त्यांचा प्रकार आहे. हिंदू धर्माविषयी प्रेम असलेली जनता आगामी निवडणुकांत काँग्रेसला मतांच्या रुपाने झटका दिल्याशिवाय राहणार नाही. यावेळी जय श्रीराम, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.