युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांची केली ढाल! कऱ्हाडचा साद शेख म्हणाला तर आम्ही..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:38 PM2022-03-03T12:38:48+5:302022-03-03T12:51:20+5:30
रशियाचे इरादे लक्षात घेऊन खरेतर युक्रेनने तेथील विद्यापीठांना धोक्याची सूचना दिली असणार तरीही ही विद्यापीठे सुरुच ठेवली होती
सागर गुजर
सातारा : रशिया हा भारताचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा विचार करुन रशिया हल्ला चढवणार नाही, हे लक्षात घेऊन युक्रेनमधील बहुतांश विद्यापीठांनी भारतीय शिकत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑफलाईन पध्दतीनेच सुरु ठेवले. थोडक्यात युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांची ढाल करुन बचावाचा प्रयत्न केला असल्याचे इव्हॅनो फ्रँक्वीस्क विद्यापीठात शिकणारा कऱ्हाडचा साद शेख याने सांगितले.
रशियाने महिनाभरापासून युक्रेनच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव केली होती. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी आक्षेप घेतल्यानंतर युध्द सरावासाठी सैन्य सीमेवर आणले गेल्याचे स्पष्टीकरण रशियाने केले होते. मात्र, तरीही २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह येथे हल्ला चढवलाच.
रशियाचे इरादे लक्षात घेऊन खरेतर युक्रेनने तेथील विद्यापीठांना धोक्याची सूचना दिली असणार तरीही ही विद्यापीठे सुरुच ठेवली होती. भारतातील २ हजारांच्यावर एमबीबीएस करणारे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत. त्यांचे शिक्षण सुरु ठेवले तर तीच ढाल म्हणून वापरता येईल, हा युक्रेनचा इरादा लपून राहिला नाही.
भारतीय दुतावासाने परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याच्या सूचना केल्या. मात्र, विद्यापीठांनी सुट्या दिल्या नसल्याने हे विद्यार्थी तिथेच अडकून पडले. युध्दाची धग लक्षात येताच नागरिकांनी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. एटीएम रिकामे झाले. बसने रोमानियाच्या सीमेपासू्न अलीकडे १० किलो सोडले. तिथून चालत जावे लागले. ४ हजारांच्यावर लोक सीमेवर धडकल्याने त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी रोमानियाच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाला होता.
या ठिकाणी आठ तास थांबू राहावे लागले. पासपोर्ट तपासूनच सर्वांना रोमानियात प्रवेश दिला गेला. तिथून केंद्र शासनाने विद्यार्थ्यांना दिल्लीत विमानाने आणले. दिल्लीत महाराष्ट्र सदनात राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती. तिथून महाराष्ट्र शासनाने विमानाने या विद्यार्थ्यांना मुंबईत आणले.
इव्हॅनो फ्रँक्वीस विमानतळावर पडला बॉम्ब
रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील राजधानीच्या किव्ह शहरावर एअर स्ट्राईक सुरु केले होते. पश्चिमेकडील इव्हॅनो फ्रँक्वीस शहर तसे सुरक्षित होते. मात्र, अचानकपणे युध्दाच्या तिसऱ्या दिवशी रात्रीच्यावेळी इव्हॅनो फ्रँक्वीस विमानतळावर बॉम्ब येऊन पडला. या बॉम्बमुळे सर्वत्र धूर झाला. शहरातील नागरिक, विद्यार्थी झोपेतून जागे झाले. विद्यापीठापासून अवघ्या ४ किलो मीटरवर हा बॉम्ब हल्ला झाला होता.
रोमानिया सीमेवर सैनिकांकडून छळ
भारतीय दुतावासाने येथील विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड, नायझेरिया, हंगेरी या देशांमधून भारतात येण्याची सोय केली. मात्र, रोमानिया सीमा ओलांडून जात असताना येथील सैन्याने हवेत गोळीबार केला. तसेच गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना मारहाणदेखील केली. या छळाला मुलींना देखील सामोरे जावे लागले.
युक्रेनवर हल्ला झाल्याचे समजल्यानंतर घरातून फोन यायला लागले होते. रशियाने केलेला हल्ला युक्रेनच्या पूर्वेकडे केला होता. आम्ही होतो पश्चिमेकडे त्यामुळे घरातल्यांची समजूत काढत होतो, त्याचबरोबर रोमानियातून भारतात परतण्यासाठीही प्रयत्न करत होतो. रोमानियाच्या सीमेवर तणाव होता, या ठिकाणी गोळीबार झाला. मात्र, आम्ही सुरक्षितपणे भारतात परतलो. - साद शेख, कऱ्हाड