उंब्रज : ‘सध्या जगभर पसरलेल्या कोरोनाच्या अनुषंगाने उंब्रज पोलिसांनी ४ ते २२ मे या कालावधीत ‘ऑपरेशन ऑलआउट’ राबविले. यामध्ये एक हजार ६८० केसेस करून चार लाख ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
या कारवाईमध्ये पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर ३६७ गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून एक लाख १०० रुपयांचा दंड वसूल केला. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर २३ केसेस करून १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला, तर ४०१ वाहने ताब्यात घेतली. विनाकारण फिरणाऱ्या २७५ लोकांवर कारवाई करून एक लाख ३९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ईपास नसणाऱ्या आठ लोकांवर कारवाई करून आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच १६ आस्थापनांवर लॉकडाऊन उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड म्हणाले, ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे.’