उंब्रज : येथील महात्मा गांधी विद्यालयाचा दहावीमधील विद्यार्थी राहुल लक्ष्मण बडस्कर याने बहुउद्देशीय पीक तोडणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राला जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि हे यंत्र आता दिल्ली येथे होणाऱ्या देश पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात झळकणार आहे. त्यामुळे उंब्रजच्या या युवा संशोधकाने आपल्या संशोधनाने दिल्लीला धडक मारली आहे.
येथील महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी राहुल लक्ष्मण बडस्कर याने बहुउद्देशीय पीक तोडणी यंत्र निर्माण केले. या यंत्रातून भुईमुगाच्या शेंगांची तोडणी होते. मका, सूर्यफूल सोलणी होते. बटाटा, बीट, गाजर, काकडी, चिप्स व कांदा चिरणीही होते. राहुलने तयार केलेले हे यंत्र जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सहभागी करण्यात आले होते. १९ उपकरणांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली आहे. यातील महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या बहुउद्देशीय उपकरणास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
ही निवड राज्य विज्ञान मंडळाचे सदस्य विलास आटोळे, राज्य विज्ञान मंडळाचे कॉर्डिनेटर प्रियंका खोले, मधुरा पाटील, प्रतिमा गैवने, शेखर पाटील यांनी केली. हे यंत्र सायकलीच्या साच्याचा वापर करून केलेले आहे. या यंत्राचा उपयोग बळ व इंधनाची बचत होण्यासाठी होणार आहे. तसेच शेतमजुरांची संख्या कमी झाल्यामुळे या यंत्राचा उपयोग होणार आहे.
राहुलला विज्ञान विभागाचे शिक्षक आर.जे. जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच टाकाऊ व भंगारातील साहित्य गोळा करून हे बहुउद्देशीय यंत्र तयार करण्यात आले आहे. प्राचार्य एस. जे .जाधव, एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक एम. एस. पाटील यांनी सत्कार केला.
मी शेतात पारंपरिक पद्धतीने शेंगा तोडणी करताना पाहिले. यामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर लागतात व वेळही जातो. हे लक्षात आले आणि यातूनच मला या बहुउद्देशीय यंत्राची कल्पना सुचली. सायकलचा साचा वापरून हे यंत्र तयार करण्याचे योजले. विज्ञान शिक्षक आर. जे. जाधव यांनी प्रेरणा देऊन हे यंत्र तयार करण्यास मदत करून हे यंत्र विज्ञान प्रदर्शनात नेले.- राहुल बडस्कर, विद्यार्थी