सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित निरंतरता मेमो असलेल्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता मान्य होण्याची आशा आता बारगळली आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणे आंदोलनास बसलेल्या या सेवकांनी मंगळवारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणासह घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. संस्था चेअरमन यांच्यासह प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आपली आक्रमकता सेवकांनी दर्शवली आहे. निवेदनात म्हटले आहे की, विविध मागण्यांसाठी रयतसेवक २३ सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. अजूनही त्यांच्यासोबत कोणी सकारात्मक चर्चा केली नाही. पहिले दोन दिवस सेवकांच्या मागण्यांवर चर्चा झाली या चर्चेत सेवकांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. संस्था पदाधिकारी आणि आंदोलन सेवक यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. या काळात साधी विचारपूस करण्याची ही तसदी संस्थेने घेतली नाही. कार्यालयासमोर सेवक धरणे आंदोलनात बसले असता संस्थेचे पदाधिकारी मात्र कार्यक्रमात व्यस्त आहेत. संस्थेतील पदाधिकारी यांना सेवकांप्रती घेणेदेणे नाही, म्हणून ३ ऑक्टोबर पासून संविधानिक पद्धतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर उपोषण करणार. यादरम्यान सेवकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास संस्थेचे चेअरमन सचिव आणि सहसचिव जबाबदार असतील असेही नमूद केले आहे. या निवेदनावर शरद इवरे, सागर खोमणे, असरुद्दीन पठाण, मेधाराणी गुरव, रूपाली सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरी आहेत.
विनाअनुदानित रयत सेवक होणार आक्रमक!, साताऱ्यात येत्या मंगळवारपासून आमरण उपोषणासह घंटानाद आंदोलन
By प्रगती पाटील | Published: September 30, 2023 5:37 PM