पाचवड : कपडे वाळत घालण्याच्या तारेमध्ये इलेक्ट्रिक करंट उतरून शॉक लागल्याने चिंधवली येथील दाम्पत्याचा दुर्र्दैवी मृत्यू झाला. तुषार रामचंद्र पवार व पत्नी शीतल तुषार पवार असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चिंधवली येथील पवारआळी येथील तुषार पवार व त्यांच्या पत्नी शीतल पवार घराशेजारी वाळत घातलेली कपडे गोळा करण्यासाठी गेले होते. ज्या तारेवार कपडे वाळत घातलेली होती त्या तारेच्यावर पत्रा होता व त्याच्यावर कडबाकुट्टीसाठी लाईटचे कनेक्शन घेतलेली वायर नेण्यात आली होती.या वायरीमधून इलेक्ट्रिक करंट पत्र्यामध्ये गेला होता व पुढे तो पत्र्यातून कपडे वाळत घातलेल्या तारेमध्ये उतरला होता. ज्यावेळी तुषार पवार यांनी तारेला हात लावला, त्याचवेळी त्यांना इलेक्ट्रिक करंटचा जबरदस्त शॉक बसला. शेजारी उभी असलेली त्यांची पत्नी त्यांना सोडविण्यास गेली असता त्यांनाही जोरदार शॉक बसला. शॉक बसल्यानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात घेऊन जात असतानाच उपचारापूर्वी दोघांचाही मृत्यू झाला.दरम्यान, तुषार पवार व शीतल पवार यांच्या लग्नाला फक्त दोनच वर्षे झालेली होती. त्यांना एक वर्षाची मुलगी असून, तुषार पवार हा पंचायत समिती सातारा येथे कामास होता. याबाबतची माहिती चिंधवली गावामध्ये समजताच गावावर शोककळा पसरली. शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
चिंधवलीतील दाम्पत्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 11:01 PM