पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या शेतीमाल विक्री व्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे
शेतकरी व्यथित झाला असून, तरकारी पिकांची काढणी-विक्री करून पैसे मिळण्याची
शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांकडून शेतीमाल बांधावर फेकून दिल्याचे चित्र
शिवारात पाहावयास मिळत आहे.
कोरोना विषाणू
संसर्गाची व्याप्ती गेल्या काही महिन्यांपासून वाढल्याने प्रशासनाने पुन्हा
लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला असल्याने यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान
झाले आहे. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने
काही उपाययोजना केल्या असल्या तरी त्यामध्ये बहुतांशी त्रुटी असल्याने शेतकरी
हतबल झाला आहे. या काळात पिकांची काढणी-विक्री करून अपेक्षित पैसे
मिळण्याची शाश्वती नसल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकरी पिकावरील मालाची
काढणी करून शेतीमाल बांधावर फेकून देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे
नुकसान होत आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाची व्याप्ती वाढत
असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्याची निश्चितता नसल्याने शेती पिकाच्या
आगामी नियोजनाबाबत शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था आहे.
(कोट..)
एप्रिल महिन्याच्या मध्यापासून परिसरात दोनवेळा गारपिटीसह वारंवार
झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच आता
लॉकडाऊनची भर पडल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. त्यासाठी
शेतकऱ्यांना शासकीय मदतीची गरज आहे
- विकास शिंदे, शेतकरी, चौधरवाडी
०८पिंपोडे बुद्रुक
फोटो: चौधरवाडी (ता. कोरेगाव) विक्री व्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्याने शेतीमालाची
काढणी करून माल बांधावर फेकून दिला आहे. (छाया : संतोष धुमाळ)