नितीन काळेल।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सततच्या आणि अवकाळी पावसामुळे या वर्षी राज्यातील साडेतीनपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे पीक संपले आहे. त्यामुळे ४० टक्केच उत्पादन हाती येणार असून, त्यालाही दर्जा नसेल. परिणामी, दरही मिळणार नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक कोलमडणार आहेत. त्यातच दर वर्षी सुमारे ३० हजार टन उत्पादन होते. यंदा ते १२ ते १४ हजार टन होऊन उत्पादकांना १५० कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात राज्यात सर्वांत अधिक स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते. ब्रिटिश आल्यापासून येथे स्ट्रॉबेरी घेतली जाते. पूर्वी स्ट्रॉबेरीचे क्षेत्र थोडे होते; मात्र १९९४नंतर क्षेत्राचा विस्तार झाला. सद्य:स्थितीत राज्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र अंदाजे साडेतीन हजार एकर असून, सातारा जिल्ह्यात ते तीन हजार एकरांवर आहे. तर, एकट्या महाबळेश्वर तालुक्यात दोन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी होते. म्हणजेच अर्ध्यापेक्षा अधिक उत्पन्न एकट्या महाबळेश्वर तालुक्यातच होते.
या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे. स्ट्रॉबेरी थंड हवामानाच्या भागात होत असल्याने दर वर्षी ५० एकरांपर्यंत कमी किंवा जास्त क्षेत्र निर्माण होते. या वर्षी हे क्षेत्र थोडेस वाढले; पण टिकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याला कारण म्हणजे सततचा आणि अवकाळी पाऊस.राज्यात पाच महिने पाऊस राहिला. त्यामुळे साडेतीन हजारांपैकी दोन हजार एकरांवरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ६० टक्के फळे वाया गेलीत.स्ट्रॉबेरी हा नाशवंत माल आहे. यावर प्रक्रिया होणे महत्त्वाचे असते. उत्पादन वाढले तर विक्री होणे आवश्यकच असते. त्यामुळे उत्पादकांना थेट विक्रीला परवानगी मिळावी. तसेच या वर्षी सततच्या आणि अवकाळी पावसामुळे ६० टक्के क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. सर्वांत महागडे हे फळ असून, आताच्या नुकसानामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या फळाला विम्याचे कवच देण्याची खरी गरज आहे.- बाळासाहेब भिलारे,अध्यक्ष स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन आॅफ इंडिया