पाटण : पाटण तालुक्यातील सुळेवाडी (सोनवडे) येथे जनावरे धुण्यास गेलेल्या मामा आणि भाचा या दोघांचाही मोरणा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच वेळी दोघांचा आकस्मित मृत्यू घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अशोक शंकर कदम, अनिकेत हरिबा चव्हाण असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूळ गाव सोनवडे येथील अशोक शंकर कदम (वय ३५) हे बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान बहिणीचा मुलगा अनिकेत हरिबा चव्हाण (१७, रा जिंती ता. पाटण) हा मामाच्या घरी आला होता. याच्यासमवेत मोरणा नदीवर गुरांना पाणी देऊन त्यांना धुण्यासाठी म्हणून गेला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गुरे घरी परतली नाही.
अशोक आणि अनिकेत हे दोघेही घरी परत आले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने आणि गावांतील तरुणांनी रात्रभर नदीकाठी शोध घेतला असता दोघेही सापडले नाहीत. मात्र गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मोरणा नदीतील खोल डोहात शोध सुरू असताना प्रथम अशोक आणि नंतर अनिकेत याचा मृत्यूदेह सापडला.
अशोक हा अविवाहित असून एका सहकारी संस्थेत काम करीत होता तर अनिकेत हा मूळचा जिंती येथील बारावीत शिकणारा आहे. लग्न समारंभाच्या निमित्ताने दोनच दिवसांपूर्वी मामाच्या गावाला (सुळेवाडी) येथे आला होता. मात्र मामा आणि भाचा या दोघांवर ही काळाने झडप घातल्याने जिंती आणि सोनवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी पाटणचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दोन्ही मृत्यूदेहाची उत्तरीय तपासणी पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन सुळेवाडी येथे दोन्ही मृत्यूदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.