सातारा : मामाच्या खूनप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी भाच्याला अटक केली असून, हा खून अनैसर्गिक कृत्यातून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंबखिंड (नागेवाडी) ता. सातारा येथे सोमवारी रात्री डब्लूकुमार रामसुंदर सिंह (वय ३८, मूळ रा. पटना, बिहार) याचा खून झाला होता. सिंह हा नागेवाडी येथील क्रशरवर काम करत होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागेवाडी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी डब्लूकुमार सिंहसोबत त्याचा भाचा कन्हैयाकुमार हवारी (मूळ रा. पटना, बिहार) हा असल्याचे समोर आले. मात्र तो नागेवाडी येथे नसल्याचे समोर आले.
कन्हैयाकुमार हा लोणावळा रेल्वेस्टेशनवरून बिहारला जाणाच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी लोणावळा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तेथील पोलिसांनी कन्हैयाकुमारला तत्काळ ताब्यात घेतले. हवालदार राजू मुलाणी, सुजित भोसले, रमेश चव्हाण, दादा परिहार यांनी लोणावळा येथे जाऊन कन्हैयाकुमारला अटक केली.
कन्हैयाकुमारकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. कन्हैयाकुमारचा मामा डब्लुकुमार सिंह हा अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी वारंवार मला प्रवृत्त करत होता. त्यामुळे त्याचा काटा काढल्याचे कन्हैयाकुमारने पोलिसांजवळ कबुल केले आहे. न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, विभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याबाबात पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करत आहेत.