मसूर: मसूर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मसूरसह भागातील ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहे. ती कोरोना चाचणी करणाऱ्या फिरत्या पथकाकडे सुपूर्द केली. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
रुग्णवाहिकेचा लोकार्पण जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ, क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सह्याद्री कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी जगदाळे म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यातही रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मसूर भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मसूर ग्रामपंचायतीस आफळे यांनी रुग्णवाहिका दिली. तिला सुदाम दीक्षित यांनी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च केले. ग्रामपंचायतीने याचा लोकांच्या आरोग्यासाठी उपयोग करावयाचे ठरविले. आरोग्य विभाग व पोलीस यांनी विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणारे यांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यासाठी फिरते कोरोना चाचणी पथक मुख्य चौकात तैनात केले आहे.’
अजय गोरड म्हणाले, ‘कोरोना काळात रुग्णवाहिकेतून फिरते कोरोना चाचणी पथक तैनात केले. याचा चांगला फायदा होईल.’
गोरड यांनी विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल केलेला ९५ हजारांचा दंड ग्रामपंचायतीच्या कार्यास सुपूर्द केला.
सरपंच पंकज दीक्षित म्हणाले, फिरत्या कोरोना चाचणी पथकात दोन वैद्यकीय कर्मचारी, एक ग्रामपंचायत कर्मचारी व एक पोलीस असणार आहे. एखादा बाधित आढळला तर त्यांच्या घरी जाऊन कोरोना चाचणी केली जाणार आहे.
यावेळी उपसरपंच विजयसिंह जगदाळे, शहाजीराव जगदाळे, विकास स्वामी, डॉ. रमेश लोखंडे, डॉ. राजेंद्र डाकवे, मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, अभय तावरे, युवराज पवार, प्रशांत पवार, जगदीश पुरोहित, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मसूर शहराध्यक्ष सिकंदर शेख, विकास पाटोळे, सुरेश पाटील, शकील शेख, प्रल्हाद कांबिरे, सुनील वेल्हाळ उपस्थित होते. माजी सरपंच प्रकाश माळी यांनी आभार मानले.
फोटो जगन्नाथ कुंभार यांनी मेल केला आहे.
मसूर येथे कोरोना फिरत्या चाचणी पथकास रुग्णवाहिकेचे लोकार्पण मानसिंगराव जगदाळे, निवासराव थोरात, अजय गोरड, सुदाम दीक्षित, लहूराज जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (छाया : जगन्नाथ कुंभार)