काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उंडाळे येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर, चंदगडचे आमदार राजेश पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, मनोहर शिंदे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी पोलीस उपायुक्त रामराव पवार, कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब यादव यांच्यासह मान्यवरांनी शनिवारी उंडाळे येथे प्रत्यक्ष भेटून अॅड. उदयसिंह पाटील यांचे सांत्वन केले. तसेच श्रद्धांजली वाहिली.
यावेळी अजित पवार म्हणाले, कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागात ज्या सहकारी संस्था उंडाळकरांनी उभ्या केल्या त्या आदर्शवत असून जिल्हा बँकेतही त्यांचे काम गौरवास्पद आहे. रयत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सहकारी सोसायटी व शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा सहकार, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील वारसा पुढे चालवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही श्रद्धांजली वाहताना विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कार्याचा गौरव केला.
दरम्यान, आमदार उल्हास पवार, चंदगडचे माजी आमदार आनंदराव पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, कऱ्हाडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, शिवराज मोरे, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, माधवराव पाटील, मुंबई जिल्हा उपनिबंधक जे. डी. पाटील, नागपूर कामगार आयुक्त नितीन पाटणकर, माजी पोलीस महानिरीक्षक रामराव पवार, माजी शिक्षण सभापती संजय देसाई यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून रयत कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. आनंदराव पाटील यांचे सांत्वन केले.
फोटो : ०९केआरडी०९
कॅप्शन : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे निवासस्थानी भेट देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.