कऱ्हाड : ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील भूमिकेबाबत ‘कोयना’ दूध संघावर मंगळवारी उंडाळकर समर्थकांची बैठक झाली. अॅड. उदयसिंह पाटील, इंद्रजित चव्हाण, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. यात बहुतांश कार्यकर्त्यांनी संस्थापक पॅनेलच्या बाजूने कल मांडल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे या निवडणुकीत उंडाळकर गटाची भूमिका नक्की काय राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेली आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या ऐतिहासिक सत्तांतरापासून उंडाळकर गटाची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी नेहमीच आपला करिश्मा दाखवून दिला आहे. कृष्णेच्या निवडणुकीत ‘जिकडे उंडाळकर तिकडे गुलाल’ असे समीकरण बहुधा राहिले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या कारखाना निवडणुकीत या गटाची काय भूमिका राहणार याबाबत कार्यक्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
निवडणुकीत सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले व डाॅ. अतुल भोसले यांना रोखण्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी गेल्या चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रक्रियेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या बरोबरीने अॅड. उदयसिंह पाटीलही अग्रेसर दिसत होते. मात्र चौदा ते पंधरा बैठका होऊनही चर्चेच्या गुऱ्हाळातून रस बाहेर न पडल्याने पुढाकार घेणाऱ्या नेत्यांची मोठी अडचण झाली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले नाही. त्यामुळे या प्रक्रियेतून मी बाहेर पडलो आहे, असे जाहीर केले. त्यामुळे महिनाभर दुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत असताना आता तिरंगी लढतीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अॅड. उदयसिंह पाटील यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. मंगळवारी त्यांनी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. त्यात कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला आहे.
मंगळवारी दुपारी झालेल्या या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक तुमची मते ऐकायला बोलविली आहे, अशी भूमिका सुरुवातीलाच मांडली गेली. सुमारे ३० वर प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना येथे व्यक्त केल्या. त्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी संस्थापक पॅनेलच्या पाठीशी उभे राहिले तर चांगले राहील अशा भूमिका मांडल्या. कार्यकर्त्यांची मते ऐकून घेतल्यानंतर तुमच्या मतांचा विचार करून दोन दिवसांनंतर आपण आपल्या गटाची भूमिका जाहीर करू, असे सूतोवाच उदयसिंह पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता उंडाळकर गटाच्या अधिकृत भूमिका जाहीर होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
चौकट
काकांच्या पश्चात पहिली निवडणूक..
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत नेहमीच किंगमेकर ठरणारे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात होणारी ही कृष्णाची पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे वडिलांप्रमाणेच त्यांचे वारसदार अॅड. उदयसिंह पाटील या निवडणुकीत आपला करिष्मा कसा दाखवणार हे पाहावे लागेल.
फोटो
उदयसिंह पाटील